व्यसनमुक्ती संदर्भात माणसे फोन करायला लागल्यापासून ठळकपणे जाणवला तो लोकांचा उपचारांच्या संदर्भातला अक्षम्य ढिलेपणा. कुठल्यातरी गुढ मार्गाने व्यसन बंद होईल या आशेने माणसं वैज्ञानिक उपचार सोडून बाकी सारे काही करून पाहतात. एकाने मला तीर्थक्षेत्री गेल्याने व्यसन सुटते असं म्हणतात मग मी करून पाहू का? मी म्हटले पहा करुन. यावर आणखी काय उत्तर देणार? माळ घालत्यावर अनेकजण व्यसन सोडतात असे ऐकले आहे. ज्यांना त्या मार्गाने जायचे असेल तरी हरकत नाहीच नाही. कोणत्या उपायाने का होईना व्यसन सुटल्याशी कारण. मात्र बहुसंख्य माणसे औषध मागतात जे व्यसनी माणसाच्या नकळत जेवणातून देता येईल. याबद्दल अनेक गैरसमज आहेत. ही औषधे फक्त मानसोपचारतज्ञ देऊ शकतात. आणि ती देताना फार विचार करावा लागतो कारण ती सर्वांना झेपत नाहीत. त्याची रिऍक्शन येऊन गंभीर प्रसंग उद्भवू शकतो. शिवाय औषध बंद झाले की व्यसन सुरु होऊ शकते. खरं तर व्यसनाकडे नेणाऱ्या स्वभावावर उपाय केला पाहिजे.
सर्दी खोकल्या प्रमाणे एखादे किरकोळ औषध घेऊन व्यसन बंद होईल असे अनेकांना वाटते. मी औषध देत नाही इतकंच काय मला औषध माहितही नाही असे म्हटले की अनेकजण हिरमुसतात आणि पुन्हा फोन करत नाहीत. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसनाला किती वर्षे झाली हा प्रश्न विचारला की अनेक बायका ते कॉलेजपासून पितात पण गेले चार वर्ष प्रमाण वाढलंय. चार वर्ष हा व्यसनाच्या दृष्टीने मोठा कालावधी म्हटला पाहिजे. इतके दिवस घालवल्यावर व्यसनाचा विळखा घट्ट बसला असेल आणि त्यामुळे काही शारिरीक, मानसिक आजार जडून परिस्थिती आणखी अवघड झाली असेल तर आश्चर्य ते काय?
यानंतर प्रश्न असतो तो पैशांचा. अनेकांची परिस्थिती व्यसनामुळे हलाखीची झालेली असते. उपचारकेंद्रात जाण्याइतकी काहींची आर्थिक परिस्थिती नसते. त्यांना अल्कॉहॉलिक ऍनॉनिमसच्या मिटिंगला जाण्यासारखा निःशूल्क उपाय सांगितला तरी गळी उतरत नाही. गुगल केल्यास जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात या सभा होतात ते पटकन कळू शकते. त्यानंतर मुक्तांगणसारख्या अनेक संस्थांच्या पाठपुरावा सभा होतात. ज्या निःशूल्क असतात. त्यांनाही हजर राहता येते. कमी पैसे भरून मुक्तांगणसारख्या संस्थांमध्ये जाऊन सल्लाही घेता येतो. मानसोपचारतज्ञाची फि भरून त्याचाही सल्ला घेता येतो. पण बहुतेकांना यातलं काहीही करायचं नसतं. त्यांना हवं असतं फक्त आणि फक्त औषध. जे नवऱ्याच्या जेवणात टाकता येईल आणि सर्दी खोकला जावा तसं व्यसन नाहिसं करता येईल.
हे सारं इतकं सहज असतं तर व्यसनमुक्तीकेंद्राची भरमसाठ वाढ झाली नसती आणि ही केंद्र दुथडी भरून वाहिली नसती. सगळ्यांनी डायबेटीस, बीपी सारख्या रोज नेमाने गोळ्याच घेतल्या असत्या. व्यसनमुक्तीच्या संदर्भातलं अगाध अज्ञान हा व्यसनमुक्तीच्या उपचारांमधला फार मोठा अडथळा आहे.
अतुल ठाकुर