नमस्कार,
मी एक उदाहरण पाहिले आहे. ज्यात पत्नीने पतीला घरी माझ्यासमोर प्या पण बाहेर तमाशा नको असे म्हणून घरी पिण्याची परवानगी दिली होती. पतीने आनंदाने हे मान्य करून घरी दारु पिण्यास सुरुवात केली. मात्र घरी येण्याआधी तो रोजचा दारुचा आपला कोटा बाहेर पूर्ण करून येऊ लागला हे अर्थातच त्याने पत्नीला सांगितले नाही. व्यसनातले असत्याचरण हे असे असते.
बिचार्या बायकोला वाटले आपण योग्य उपाय केला. आता पती बाहेर पिणार नाही. मर्यादेत राहिल, पैसाही वाचेल. शिवाय बाहेर भानगडी होणार नाहीत. पण झाले उलटेच. तो पूर्वीपेक्षाही जास्त पिऊ लागला आणि तेही पत्नीला अंधारात ठेवून आणि राजरोसपणे तिच्याचसमोर. खरं तर व्यसनाला कसलिही मर्यादा नसते. म्हणून तर त्याला व्यसन म्हणतात.
व्यसनात मिळालेला तथाकथित आनंद हा पुढे एक किंवा दोन पेगने मिळत नाही. दारुचे किंवा कुठल्याही मादक पदार्थाचे प्रमाण वाढत जाते. पुढची पायरी म्हणजे कुठल्याही वेळी व्यसन केले जाते. अनेकदा शेयरींगमध्ये सकाळी पाच वाजल्यापासून पिण्यास सुरुवात करण्याच्या हकीकती ऐकल्या आहेत. पण हा टप्पा येण्याआधी असत्याचरण हा व्यसनी माणसाच्या स्वभावाचा कसा भाग बनून जातो यावर आपण चर्चा करुया. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर