नमस्कार,
व्यसनात बराच काळ गेल्यावर जेव्हा व्यसनाचे भीषण परिणाम दिसु लागतात आणि स्वतःच्या मनाने केलेले उपाय फोल झालेले दिसतात तेव्हा माणसे व्यसनमुक्तीकेंद्राच्या पर्यायाचा विचार करु लागतात. अशावेळी सत्य हे फक्त व्यसनी माणसानेच बोलावं आणि घरच्यांनी सोयिस्कर गोष्टी लपवाव्या असं नसतं. सत्य बोलण्याची अपेक्षा ही व्यसनी माणसांइतकीच घरच्यांकडूनही असते.
उदाहरणच द्यायचं झालं तर मुक्तांगण हे व्यसनमुक्तीकेंद्र आहे, इस्पितळ नाही ही साधी गोष्ट लोकांनी लक्षात घ्यावी अशी अपेक्षा असते. म्हणजे एखाद्या गंभीर शारिरीक आजारावर मुक्तांगणमध्ये उपचार होऊ शकत नाहीत. अनेकदा व्यसनामुळे व्यसनी माणसाला अगोदरच काही गंभीर दुखणी जडलेली असतात. घरचे आणि व्यसनी माणुस दोघेही ही माहिती लपवतात. आणि उपचारांच्या दरम्यान कठीण परिस्थिती उद्भवु शकते.
आपल्याला व्यसनापासून सुटका करण्याची घाई लागलेली असते हे मान्य. पण जेव्हा सत्य परिस्थिती सांगितली जाते तेव्हा त्याप्रमाणे पर्यायदेखिल मुक्तांगणकडून सुचवले जाऊ शकतात. त्यामुळे घरच्यांनीही सत्य लपवू नये ही अपेक्षा आहे. घरच्यांकडूनही असत्य वर्तन कसं घडतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर