नमस्कार,
व्यसनातील कर्जबाजारीपणा हा व्यसनाच्या भीषण परिणामातील एक अतिदु:खद अध्याय आहे. यातून अनेक अनर्थ उद्भवतात. पण यात खेदाची गोष्ट अशी की या परिस्थितीत मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात नेमकी व्यसनी माणसाला भेटते. ही माणसे व्यसनी माणसाला व्यसनासाठी नुसते पैसेच पुरवतात असे नाही तर पुढे व्यसनासाठी पैसे कमी पडल्यास कर्ज मिळवण्याचे निरनिराळे मार्गदेखिल सुचवतात.
व्यसनी माणसावर व्यसनाचा अंमल असतो. व्यसन मिळवण्यासाठी त्याची कुठल्याही थराला जाण्याची तयारी असते. त्यामुळे तो अशा माणसांच्या जाळ्यात अलगद सापडतो. या कर्जबाजारीपणाची सुरुवात खोटेपणातून होते. आणि मग एक खोटेपणा लपवण्यासाठी दुसरा करावा लागतो. अशा खोटेपणाच्या मालिकेतून व्यसनीमाणसाची विश्वासार्हता पूर्णपणे लयाला जाते.
या कर्जबाजारीपणामुळेच अनेकदा व्यसनमुक्तीची सुरुवात ही कर्ज फेडण्यापासून होताना दिसते. ही कर्जे लाखाच्या घरात असू शकतात. देणेकरी तगादा लावत असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती याचा प्रत्ययही यावेळी येतो. काही खरोखर दयाळू माणसे असतात. त्यांना घरात कुणीतरी गंभीर आजारी आहे ही थाप ठोकून व्यसनी माणसाने पैसे उचललेले असतात. कर्जबाजारीपणावर आणखी चर्चा आपण पुढे करुच.तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर