नमस्कार,
व्यसनाच्या सुरुवातीला माणसे व्यसनी माणसाने व्यसन सोडावे म्हणून अनेक गोष्टी करतात. त्यातच एक म्हणजे कुटूंबातील सदस्य, मित्रमंडळी, नातेवाई़क हे व्यसनी माणसाची समजूत घालून त्याला व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. समजूत घालण्याचा प्रयत्न करणे, दोन चांगल्या गोष्टी सांगून व्यसनी माणसाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करणे हे चांगलेच आहे यात वाद नाही. पण काहीवेळा समजूत घालण्याच्या काही तर्हा या वास्तवाला सोडून असतात हे समजूत घालणार्यालाही माहित नसते. याचे कारण समाजात असलेले व्यसनाबद्दलचे अज्ञान.
कुणीतरी येतो आणि सांगतो ” मी रोज फक्त एकच पेग घेतो. अनेक वर्षं घेतोय. मला कुठे व्यसन लागलं? माझा स्वतःवर कंट्रोल आहे. तुझा कंट्रोल नाही. तु कंट्रोल ठेवायला शिक.” ही समजूत घालण्याची पद्धत वरवर योग्य वाटत असली तरी हे सांगणार्याला व्यसनाबद्दल शास्त्रीय अशी काहीही माहिती नाही हेच त्यातून दिसून येते. व्यसनी माणूस एका पेगवर थांबू शकत नाही हेच सत्य लोकांना माहित नसतं. एक पेगही त्याच्यासाठी विषासमान असतो. त्यामुळे समजवणार्याचा उद्देश कितीही चांगला असला तरी तो व्यसनी माणसाला पुन्हा व्यसनाकडेच नेऊ शकतो असे म्हणणे भाग आहे.
आपल्या समाजात व्यसनाबद्दलचे अज्ञान कशा तर्हेचे असते याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर