नमस्कार,
वर्तनात ठामपणा यायचा असेल तर विचारात स्पष्टता हवी. आपण सैलपणे अनेकांना आपले मित्र म्हणत असतो. पण ते खरोखर आपले मित्र असतात का याचा ज्याला सोबर राहायचं आहे त्या माणसाने विचार करणं अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. तुम्हाला कळत नकळत किंवा हेतुपुरस्सर व्यसनाकडे वळवणारी माणसे तुमचे “मित्र” असु शकतात का याचा मनाशी विचार व्हायला हवा. तुम्हाला व्यसनाच्या दिशेने वळवणारी माणसे तुमचे मित्र नसतातच हे पक्के लक्षात घ्यावे.
काहींशी आपली अनेक वर्षांची मैत्री असते. आपल्याला त्या माणसाची सवय झालेली असते. त्याच्या सहवासात बरे वाटते. पण त्याला आपली खरोखर चिंता असेल आणि आपले भले व्हावे असे वाटत असेल तर तो आपल्याला व्यसनाकडे नेणार नाही हे नक्की. पण जर तो मित्र आपल्याला व्यसनाकडे ओढत असेल तर ती मैत्री तोडून टाकावी असे मला वाटते. कदाचित सुरुवातीला वेदना होतील. पण शरीराचा सडलेला भाग ऑपरेशन करून काढावा आणि निरोगी व्हावे असा हा प्रकार आहे. अन्यथा तो भाग आपल्या शरीरात रोग पसरवतो.
असे मित्र दूर का ठेवावेत याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर