मानसोपचार क्षेत्र हे विचार, भावना आणि वर्तन या तीन गोष्टींच्या अवतीभवती फिरत असते. मनात विचार उत्पन्न होतात. त्यानुसार मनात भावना निर्माण होतात आणि त्याप्रमाणे कृती घडते. पुन्हा जी कृती घडते त्यांचा विचार आणि भावनांवर परिणाम होतो. आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट आवडते किंवा आवडत नाही यामागे काही कारण असते. कदाचित ते काहीवेळा आपल्याला पटकन सांगताही येणार नाही. पण नावडत्या गोष्टी आपल्या मनात प्रतिकूल भावना निर्माण करत असतात. याउलट आवडत्या गोष्टींनी एक प्रकारचे सुख वाटत असते. साधा आपल्याला कोणता रंग आवडतो असे विचारले तरी आपले उत्तर वेगवेगळे येते. प्रत्येकाला आवडणारा रंग निराळा आणि तो का आवडतो त्यांची कारणेही निराळी. आवडणाऱ्या रंगामागेही काहीतरी विचार असतो. कोणतीतरी सुखावणारी भावना असते. आपले वर्तन हे भावना आणि विचार यांच्याशी जोडलेले असते. काहीवेळा आपल्याला काही व्यक्ती आवडत नाहीत. त्यांच्यासमोर आपण ते स्पष्ट बोलू शकत नाही. अशावेळी आपण त्या व्यक्ती आवडत नसतानादेखील त्यांच्याशी गोड बोलत असतो. अशावेळी कुणी म्हणेल मग हे वर्तन विचारांशी जोडलेले कसे?
तर अशावेळी सुद्धा आपल्या मनात आपण इतरांसामोर आपली नाराजी दाखवणे योग्य नाही असा विचार असतोच आणि त्यातूनच आपण त्या व्यक्तीशी मनात नसतानादेखील मुद्दाम गोड वागत असतो. आपले विचार, वर्तन आणि भावना हे एकमेकांवर परिणाम करत असतात. विचार भावनांवर परिणाम करतात आणि भावना वर्तनावर परिणाम करत असतात. वर्तन हे पुन्हा विचारांवर परिणाम करते आणि हे चक्र सुरू राहते. मानसोपचार करताना हे चक्र लक्षात घेणं गरजेचं असतं. कुठलाही विचार, भावना आणि त्याद्वारे होणारी कृती ही दीर्घकाळ सुरू राहिल्यास ते चक्र एका चिवट सवयीत बदलू शकते. मानसोपचार करून घेण्यासाठी आलेल्या माणसाला अशाच काही त्रासदायक सवयी लागलेल्या असण्याची शक्यता असते. मात्र या सवयी काहीवेळा एखाद्या समस्येला तोंड देताना लागलेल्या असू शकतात.त्यामुळे त्या उपचार करणाऱ्याला कितीही अयोग्य असल्या तरी पटकन जात नाहीत. माणसे वरवर आपण चुकीच वागत आहोत हे मान्य करतीलही पण त्यांच्या वागण्याच्या पद्धती लगेच बदलताना दिसत नाहीत. कारण एखाद्या समस्येशी तोंड देताना ते वापरत असलेले हे “कोपिंग मेकॅनिझम” असू शकते. त्यामुळे माणसे आपल्या वर्तणूकीला चिकटून असतात.
हे जे “डिनायल” आहे ते भेदणे हे अवघड काम असते आणि ते समुपदेशकाला करावे लागते. त्याशिवाय अनेकदा पुढची प्रगती होणे कठीण होऊन बसते. आपल्याला काही समस्या आहे हेच ज्याला मान्य नाही त्याच्या समस्येवर उपाय कसा करणार? त्यामुळेच स्वीकाराचं महत्व अधोरेखित करावं लागतं. स्वीकार याचा अर्थ शरणागती नाही. स्वीकारानंतर खरं तर समस्येशी कसं लढायचं याची योग्य कल्पना येऊ शकते. त्यादृष्टीने काही आखणी करता येते. आयुष्यात सकारात्मक बदल करता येतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली गरज नसताना चाललेली धडपड संपते. अस्वीकार करताना जो मानसिक तणाव येत असतो, काही गोष्टी लपवाव्या लागतात, या साऱ्याचा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो, तो संपतो. आपल्यासमोर आपला मार्ग स्पष्ट होतो. आपली उर्जा वाचते जी पुढे समस्येशी तोंड देण्यासाठी वापरता येते. समस्येचा स्वीकार याचा अर्थ भर चौकात जाऊन आल्यागेल्यासमोर आपल्या समस्येची जाहीर वाच्यता करणंही नसतं. स्वीकार हा प्रथम स्वतःशी हवा. त्यांनतर आपण इतरांशी आवश्यकतेप्रमाणे त्याबाबत बोलू शकतो.
मानसोपचारातला दुसरा महत्वाचा भाग म्हणजे काहीवेळा उपचारांसाठी आलेली माणसे स्वतःलाच दोष देत राहतात त्यांच्या मनातील अपराधीपणाची भावना नाहीशी करणे. हे माझ्याच वाट्याला का आलं या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकत नाही. काहीजण कर्माच्या तत्वज्ञानातून या प्रश्नाचं उत्तर शोधत असतात. काहीहे असले तरी स्वतःला दोष देत बसल्याने समस्या सुटत नाही हे नक्की. त्यामुळे माणुस सातत्याने भूतकाळात डोकावत राहतो आणि समस्या मात्र वर्तमानकाळातील असते त्याकडे दुर्लक्षच होते. स्वतःला दोष देणे, मनात अपराधीपणाची भावना वागवत राहणे, स्वतःच्या बाबतीत अति कठोर होणे, या गोष्टी आपल्याला त्या समस्येतून बाहेर येऊ देत नाहीत. काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, काही समस्यांना इतर घटकही कारणीभूत असतात या वस्तूस्थितीकडे माणसाचे अशावेळी दुर्लक्ष होते. या सर्व गोष्टींमुले माणसाचे मन अशांत होते आणि त्यावर उपचार करने हे कठीण होऊन बसते. स्वीकारामुळे ही परिस्थिती बरीचशी ताब्यात येऊ शकते आणि आपली सर्व उर्जा ही उपायावर केंद्रित करता येते.
अर्थात या गोष्टी बोलायला जितक्या सोप्या असतात तितक्या करताना अवघड होऊ शकतात. समुपदेशनाची मदत यासाठीच घ्यायची असते कारण त्यात टप्प्याटप्प्याने आपल्याला योग्य दिशा दाखवली जाते.
अतुल ठाकुर
Counseling Psychologist
(मनापासून या सदरासाठी लिहिले जाणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याला मनासंबंधी काही समस्या किंवा आजार असल्यास मानसोपचारतज्ञाचे अथवा समुपदेशकाचे मार्गदर्शन घ्यावे.)