व्यसनाच्या बाबतीत मनात जेव्हा असे वाटते कि मला सर्व कळते तेव्हा ती धोक्याची घंटा समजावी. असंख्य शेयरींगमध्ये हे ऐकले आहे की अहंकारामुळे पुन्हा स्लिप आणि रिलॅप्स झाली. या टप्प्यावर आपण जरा आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यामध्ये फरक काय याची चर्चा करुयात. कारण आपण अनेकांकडून ऐकलेले असते की जीवनात माणसाला आत्मविश्वास असला पाहिजे. याचा अर्थ आत्मविश्वास असणे ही वाईट गोष्ट नसतेच. उलट व्यसनमुक्तीपथावर आत्मविश्वास असणे चांगलेच असे माझे मत आहे. एक उदाहरण देऊन आपल्याला हे समजून घेता येईल.
समजा तुम्ही व्यसन सोडले आहे. पण पूर्वीचे व्यसनी मित्र तुम्हाला पार्टीसाठी बोलावत आहेत. तर आपण त्यांना स्पष्ट नाही म्हणू शकतो असा आत्मविश्वास तुम्हाला वाटत असेल तर ते चांगलेच आहे. त्यामुळे तुम्हाला बळ मिळेल आणि तुम्ही त्यांना स्पष्ट नकार देऊ शकाल. कदाचित तो इतका स्पष्ट असेल की पुढे ती मंडळी तुमच्या वाटेसच जाणार नाहीत. इथे आत्मविश्वासाने आपली भूमिका बजावलेली दिसते. आपला विरोध आत्मविश्वास असण्याला नाहीच.
आपण बोलत आहोत ते अतिआत्मविश्वास असण्याबद्दल. त्यामुळे अतिआत्मविश्वास कसा ओळखावा यावर आपण उद्या चर्चा करुयात.तोपर्यंत मंडळी फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
आपला
अतुल ठाकुर