फक्त आजचा दिवस – ६४ – घरच्यांचे उपाय

नमस्कार,

व्यसन हळुहळ वाढु लागल्यावर घरच्यांच्या लक्षात येते की प्रकरण हाता बाहेर चालले आहे. कधीतरी तब्येत बिघडू लागते. घरात भांडणे सुरु होतात. पत्नी, मुलांवर हात उगारला जातो, कामावर दांड्या होऊ लागतात. कधीतरी बाहेरचे लोक आधार देऊन व्यसनी माणसाला घरी आणून सोडतात. रस्त्यावर पडणे झडणे सुरु होते. अशासारख्या अनेक गोष्टी वारंवार होऊ लागल्या की घरच्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येऊ लागते. पण व्यसनमुक्तीकेंद्रात दाखल करण्याचा टप्पा यायला अद्याप अवकाश असतो. माणसांना स्वतःच काही उपाय करून व्यसनाला पायबंद घालायचा असतो.

व्यसनाबद्दल शास्त्रशूद्ध माहिती नसल्याने आपण काही उपाय करुन व्यसन थांबवु शकु असे लोकांना वाटल्यास नवल नाही. त्यातही बरेचदा व्यसनी व्यक्ती देवभक्त असल्यास सोमवार, गुरुवार, शनिवार अशा वारी दारु पित नाही. श्रावण महिन्यात कडकडीत उपास करते. दारुला शिवतही नाही. त्यामुळे म्हटलं तर तो स्वत:वर “कंट्रोल’ ठेऊ शकतो अशासारखे गैरसमज व्यसनी व्यक्तीबद्दल निर्माण झालेले असतात. स्वतः व्यसनी व्यक्तीला तर आपण कधीही व्यसन सोडू शकतो असे निदान सुरुवातीला तरी वाटत असते.

तेव्हा घरचे पहिला उपाय करतात तो हा की प्यायची असेल तर घरी आणून पी. बाहेर बार मध्ये लोकांसमोर तमाशा नको. या एका उपायाने व्यसनी व्यक्तीला घरात व्यसन करण्याचे लायसन्स मिळते. या लायसन्सचा तो यथेच्छ उपयोग करतो. मात्र यातही फसवणूक कशी केली जाते यावर आपण उद्या चर्चा करुया. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे हे लक्षात ठेवा.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...