नमस्कार,
कुणाची श्रद्धा कुणावर आणि कशावर असावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. याबद्दल आम्हाला येथे कसलिही चर्चा करायची नाही. मात्र असं एक निरिक्षण आहे की व्यसनाचे भीषण परिणाम जाणवू लागले की माणसे अगतिक होतात. अनेकदा घाबरतातही. आणि मग स्वतःहून किंवा इतरजण सांगतील ते उपाय करु लागतात. त्यातच भविष्य पाहणे, बाहेरची बाधा आहे का ते पाहणे, अंगारे धुपारे यांसारखे उपाय करणे सुरु होते.
माणसाची आशा अनंत असते आणि अशासारख्या उपायांनाही अंत नसतो. यामुळे अनेकदा असं दिसून आलं आहे की लोकांचा बहुमूल्य वेळ आणि पैसा वाया जातो. व्यसनाचा विळखा आणखी घट्ट होतो. कुठल्याही आजारावर वेळीच उपचार झाले नाहीत तर आजार वाढतो. व्यसन या आजाराचीही गोष्ट वेगळी नसते.
पाठपुरावा मिटींगमध्ये एक गृहस्थ आपण मुक्तांगणला येण्याआधी अशा तर्हेचे कुठले उपाय केले याचे वर्णन करीत असत. एका सहचरीला घरच्यांनी पतीच्या व्यसनासाठी उपासतापास करायला सांगितले होते. व्यसनाच्या बाबतीत आणखी कुठल्या समजूती आपल्या समाजात वावरत असतात याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर