नमस्कार,
पाठपुराव्याला काहीवेळा परमेश्वराने खास वेळ देऊन बनवलेली माणसे येतात आणि इतरांच्या डोक्याला ताप देऊ लागतात. एकदा एक असेच गृहस्थ आले. ते स्वतःच्या सिगारेटच्या व्यसनाबद्दल सांगु लांगले. आणि शेवटी त्यांनी षटकार ठोकला. म्हणाले मी माझे व्यसन मर्यादेत ठेवू शकतो. खरं तर व्यसन आणि मर्यादा हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत असे म्हणायला हरकत नाही. जेथे व्यसन असते तेथे मर्यादा कधीही नसते.
शिवाय तुमचा दावा जर असा असेल की तुम्ही मर्यादेत आहात तर तुम्ही व्यसनी नाही असेही म्हणता येईल. जी माणसे तथाकथित मर्यादेत राहून व्यसन करण्याचा दावा करतात त्यांच्याशी आम्हाला कसलाही वाद घालायचा नाही. गंमत म्हणून देखिल व्यसनाकडे माणसाने कधीही वळू नये असेच आमचे म्हणणे आहे. कारण कोण कधी व्यसनी होईल याबद्दल काहीही ठामपणे सांगता येत नाही ही वस्तूस्थिती आहे. वीस वीस वर्षे आरामात सोशल ड्रिंकिंग करणारे माणसे अचानक व्यसनी झाल्याची उदाहरणे आमच्यासमोर आहेत.
अशावेळी कोण काय म्हणतो आहे ह्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपला समुपदेशक काय म्हणतो आहे याकडे लक्ष देणे जास्त योग्य. आपण मर्यादेत कधीही राहू शकत नाही याची खुणगाठ मनाशी बांधून ठेवणे जास्त योग्य. अशी चमत्कारीक माणसे कधी कधी भेटतात. त्याबाबत चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर